महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे अंदाजे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक आधीच दिल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना अभ्यासाची योग्य तयारी आणि नियोजन करता येईल.
बारावी (HSC) परीक्षेसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापन या परीक्षा 23 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत होतील. त्यानंतर लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 18 मार्च 2026 पर्यंत चालतील. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान यांसारख्या विषयांच्या प्रात्यक्षिक व ऑनलाइन परीक्षा देखील याच काळात घेतल्या जातील.
दहावी (SSC) परीक्षेसाठी शरीरशास्त्र, गृहविज्ञान इत्यादी विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या दरम्यान घेतल्या जातील. तर लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 18 मार्च 2026 रोजी संपतील. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांच्या ऑनलाइन परीक्षा देखील या वेळापत्रकात असतील.
मंडळाने अद्याप विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नाही. मात्र लवकरच ते मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे उपलब्ध होईल. विभागीय सचिवांना हे वेळापत्रक सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी या अंदाजे वेळापत्रकानुसार अभ्यासाचे नियोजन सुरू करावे. आता पासून दररोज थोडा-थोडा अभ्यास केल्यास परीक्षा जवळ आल्यावर ताण कमी होईल आणि तयारी अधिक चांगली होईल.